
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- तापी नदी तिरावर असलेल्या सावखेडा येथे ग्रामस्थांची ग्रामदैवत असलेल्या चंडिका मातेचा यात्रोत्सव 15 मार्चला सुरू होत असून भाविकांनी यात्रोत्सवात येऊन दर्शन घेण्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
चंडिका माता ही परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून ग्रामदैवत आहे. मातेला आंबाळाची भाजी व बाजरीची भाकरीचे नैवैद्य देण्यात येते व भाविकांना ही प्रसादाच्या रुपात भाजी भाकरीचे वाटप करण्यात येते. भाविक आपल्या मानलेल्या मनोकामना व नवस यात्रोत्सवात येवून श्रद्धेने फेडत असतात. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब गावात येऊन गावांत आनंदोत्सव साजरा करीत असतात. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे यात्रोत्सव न झाल्याने भाविकांनी आता कोरोनाचे नियम पाळून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दिनेश कदम, भुपेंद्र कदम, विजय महाले यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या प्रांगणात पंचायत समितीचे सदस्य प्रविण पाटील यांनी त्यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉकचे काम मार्गी लावले आहे. भाविकांनी 15 मार्चपासून यात्रोत्सवात येऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




