
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय स्तरावरील ” भारताच्या जडणघडणीत पंडित नेहरूंचे योगदान” या पुस्तकाच्या विषयावर ई – परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेचे उद्घाटन साक्री येथील माजी प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण, प्रा. व्यंकटेशरलू ( तेलंगणा), प्रा. डॉ. विजय तुंटे हे होते. या ई-परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून जळगाव जिल्हा संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष व ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील हे होते. सदर परिषदेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या परिषदेचे समन्वयक म्हणून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी काम पाहिले. सदर परिषदेत राष्ट्रीय व राज्य स्तरावरून बहुसंख्य प्राध्यापकांनी सहभाग नोंदवित आपापले शोधनिबंध सादर केले होते. त्यापैकी निवडक शोध निबंधांचे ISBN क्रमांकाचे पुस्तक तयार करून त्याचे प्रकाशन दि. 10 मार्च 2022 रोजी श्री. काळभैरव मंदिर प्रांगणात, महाविद्यालयाच्या रासेयो निवासी शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी संस्थाध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, संस्थेचे सचिव देविदास बारकू पाटील व प्रमुख अतिथी प्रकाश पाटील, शेतकी संघ, प्रेसिडेंट अनिल शिवदास पाटील यांच्या उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच गोवर्धन-बोरगाव, मारवड परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, प्राध्यापक – प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







