
अमळनेर:- तालुक्यात मारवड, दिनांक 19/3/2022 रोजी कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने “भारतीय स्वातंत्र्य चळवळ” या विषयावर ऑन-लाईन राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या वेबिनारचे उद्घाटन दिलीप रामू पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य,क.ब.चौ. उ.म.विद्यापीठ, जळगाव. यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भारत सरकारच्या इतिहास संशोधन विभागाचे सल्लागार मा. डॉ. अरुणचंद्र शंकरराव पाठक. तसेच बिटको काॅलेज, नाशिक येथील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. संतोष बोडके हे होते. सदर वेबिनारचे अध्यक्षस्थान जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष आणि ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड चे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील यांनी भुषविले. वेबिनारचे उद्घाटक दिलीप रामू पाटील यांनी उद्घाटनीय भाषणातून संपूर्ण देशात व उत्तर महाराष्ट्रात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या विविध कार्याचा परिचय करून दिला.
सुत्रसंचलन वेबिनारचे समन्वयक प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले सर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. व्ही. डी. पाटील यांनी करून दिला. वेबिनारचे प्रमुख वक्ते डॉ. अरुणचंद्र शंकरराव पाठक यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध प्रवाह, क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे महत्त्व सांगून, विविध ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य चळवळी व उठाव दडपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. तर वेबिनारचे दुसरे वक्ते प्रा. डॉ. संतोष बोडके यांनी आपल्या व्याख्यानातून भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय, विकास आणि स्थानिक राजकारणातील हस्तक्षेप यावर प्रकाश टाकीत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी महाराष्ट्रातील विविध विचारवंत, लेखक, क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या प्रयत्नांबाबत ऊहापोह केला. विशेषतः महाराष्ट्रात लोकमान्य टिळक व संपूर्ण भारतात म. गांधी यांनी उभारलेल्या विविध आंदोलने व चळवळींबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात जयवंतराव पाटील यांनी वेबिनारला शुभेच्छा देवून, अमळनेर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. तसेच अशा वेबिनार मधून आजच्या पिढीला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींची माहिती मिळून, खूप काही शिकायला मिळेल अशी आशा व्यक्त केली. वेबिनारचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. वेबिनारची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या वेबिनारमध्ये संपूर्ण भारतातून 190 पेक्षा अधिक अभ्यासक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. वेबिनारचे संपूर्ण तांत्रिक संचलन कुशल ठक्कर यांनी केले होते. सदर वेबिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




