
अमळनेर:- तालुक्यातील मारवड, येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधनी व समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. जितेंद्र माळी, व प्रा. डॉ. संजय महाजन हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते म. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी आपल्या प्रास्ताविकातून म. ज्योतिबा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता मांडली. तद्नंतर कार्यक्रमाचे वक्ते प्रा. डॉ. संजय महाजन यांनी स्त्री शिक्षण व समाज उद्धारासाठी फुलें दाम्पत्याच्या योगदानाबद्दल प्रकाश टाकून आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी आपल्या व्याख्यानातून स्त्री शिक्षण, छ. शिवाजी महाराजांची समाधी शोध व जयंती उत्सव, बालहत्या प्रतिबंधक गृह, प्रौढ शिक्षण वर्ग व सत्यशोधक समाजाची स्थापना, नाभिकांचा संप, पुणे नगरपालिका सदस्य व कार्य, लिहीलेले विविध ग्रंथ व दिनबंधू वृत्तपत्राचे प्रकाशन तसेच दलितांच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेवून म. फुले यांचा संक्षिप्त जिवनपट उपस्थितांसमोर मांडला. अध्यक्षीय भाषणात प्रा. व्ही. डी पाटील यांनी म. फुले यांना भारतीय समाज सुधारकांचे मुकूटमणी संबोधून, त्यांनी भारतात सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ नंदा कंधारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.







