मान्यवरांनी केली मंगळग्रह सेवा संस्थेची प्रशंसा…
अमळनेर :- येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर परिसरात व परिसराबाहेरही ११ एप्रिल रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व संस्थेच्या नूतन माहिती पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार अनिल पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संतश्री प्रसाद महाराज, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, ज्येष्ठ नेते अनिल शिसोदे आदी प्रमुख अतिथी होते. यावेळी मंदिराच्या प्रांगणातील श्री तुळसाई उद्यानातील नवनिर्माण करण्यात आलेल्या जुन्या कारंजाचे तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच नवीन कारंजाचे उद्घाटन झाले. हे दोन्ही कारंजे संगणकीकृत असून, त्यांच्यात प्रत्येकी ४० प्रकारच्या विविध हालचाली आहेत. मंदिर प्रांगणातील श्री शिवजींच्या मूर्तीजवळील संपूर्ण परिसराचे नवनिर्माण करण्यात आले आहे. तेथे एलईडी दिवेयुक्त संस्थेचे नाव व मंगळग्रहाचा ॐ अं अंगारकाय नमः हा मंत्र रोवण्यात आले आहेत, त्यांचेही उदघाटन झाले. तसेच मंदिराच्या संतश्वी सखाराम महाराज रोपवाटिका व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचेही उद्घाटन झाले. संस्थेच्या नूतन माहिती पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. वरील सर्व कामांचे उद्घाटन संतश्री प्रसाद महाराज, आमदार अनिल पाटील व प्रतापराव पाटील यांनी केले. दरम्यान, मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव व पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या यशस्वी कार्याबद्दल तथा त्यांनी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे उभारणी अभियान सुरू केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र, श्री मंगळग्रहाची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन संतश्री प्रसाद महाराज, आमदार अनिल पाटील व डॉ. मुंढे यांनी सत्कार केला. याप्रसंगी डॉ. मुंढे म्हणाले, की पोलिस दल समाजहितासाठी करीत असलेल्या कार्यात मंगळग्रह सेवा संस्था करीत असलेले सहकार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. संस्थेचे एकूणच कार्य अत्यंत सेवाभावी, नियोजनबद्ध व अनुकरणीय आहे. आमदार अनिल पाटील म्हणाले, की विकासकामे करण्यात आणि आगळेवेगळे व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी अत्यंत तरबेज आहेत. शासनाच्या माध्यमातून विविध योजना तथा निधी प्राप्तीसाठी कसे प्रयत्न करावेत, हे मंगळग्रह सेवा संस्थेकडूनच शिकावे. मी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने नजीकच्याच काळात भरीव शासकीय निधीच्या माध्यमातून मंदिराचा प्रचंड कायापालट होईल. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक विनोद पाटील, प्रदीप
अग्रवाल, नीरज अग्रवाल, उपाध्यक्षा माधुरी पाटील तसेच माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन यांचाही सत्कार करण्यात
आला. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर,
सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक
उपस्थित होते.