
जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली मागणी…
अमळनेर:- काल दि.९ मे रोजी शासनाने राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाच्या ५ समान हप्त्यांपैकी माहे जून २०२२मध्ये देय असलेल्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याचा अध्यादेश पारित केला. शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेत असतांना शालेय शिक्षण विभागाला मात्र वंचित ठेवले आहे. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देत असतांना काही जिल्ह्यांना अनुदान दिले. मात्र अद्यापही जळगाव जिल्ह्याला सदर अनुदान उपलब्ध करून दिलेले नाही. असे भेदभावाचे धोरण चुकीचे असून प्रथमतः दुसऱ्या हप्त्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत असलेल्या निमसरकारी कर्मचाऱ्यांना व २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता देखील द्यावा व जळगाव जिल्ह्यावर सातत्याने होत असलेला अन्याय दूर करावा यासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टो)जिल्हा पदाधिकारी यांनी शिक्षक आमदार किशोरजी दराडे, किरणजी सरनाईक, डॉ.सुधीरजी तांबे, विक्रमजी काळे यांच्याकडे सदरहू अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.







