कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील टाकरखेडा येथे दि. २६ जुन रोजी कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास दिन साजरा करण्यात आला.यावेळी बाजरी बियाणे १०० ग्रॅम प्रमाणे मिनी किट चे वाटप उपविभागीय कृषी अधिकारी डी. व्ही. जाधवर यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच रामभाऊ भिल होते. यावेळी मातोश्री इंदूताई ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी कृषि विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य सोयाबीनचे बियाणे मिनीकिट वाटप करण्यात आले. तृणधान्य पिकांचे महत्त्व व आहारातील स्थान याविषयी वारे यांनी मार्गदर्शन केले व कृषि सहायक प्रविण पाटील यांनी शेतकऱ्यांना बीजसंस्कार (प्रक्रिया) प्रात्यक्षिक करून कापूस उत्पादकता वाढ प्रकल्प व विभागाच्या इतर योजनांची माहिती दिली. तालुका तंत्र अधिकारी भूषण पाटील यांनी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीबद्दल माहिती दिली. यावेळी आत्मा अंतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजनेच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या कुटुंबांना भाजीपाला बियाणे किटचे वाटपही करण्यात आले. या प्रसंगी कृषि औजारे बॅंकेला भेट देऊन शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणीयंत्राद्वारे पेरणी करण्याचे आवाहन केले. शेतकरी उत्पादक कंपनी ही ,राष्ट्रीय कृषि आणि ग्रामिण विकास बॅंक (NABARD) यांच्या मार्फत ” राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांनी स्थापन केली असल्याची माहिती भटू आबा यांनी उपस्थित अधिकारी व शेतकऱ्यांना दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी स्थानिक कृषी सेवा केंद्र यांना भेट देऊन खरीप हंगामात विक्री होत असलेल्या बियाणे जैविक खते किटनाशके यांचे उपलब्धते बाबत तपासणी केली. त्यांना भाव फलक, साठा फलक व साठा रजिस्टर अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या सदर कार्यक्रमाला माजी सरपंच प्रकाश पाटील, तसेच शंतनु पाटील, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रमोद पाटील, नगराज पाटील, जिग्नेश पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रविण पाटील कृषी सहाय्यक यांनी केले.