अमळनेर पोलिसांनी ३ मुली व ४ मुलांची केली बालसुधारगृहात रवानगी…
अमळनेर:- उदरनिर्वाहासाठी काहीच साधन नसल्याचे सांगत पोटच्या पोरांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला काल अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की, एक महिला सुभाष चौकात काही मुलांची विक्री करीत आहे. त्यावरून पो.ना नाजिमा पिंजारी, दीपक माळी, पो. कॉ. रवींद्र पाटील यांनी सदर ४० वर्षीय महिलेला व मुलांना ताब्यात घेत अमळनेर पोलीस ठाण्यात हजर केले. सदर महिलेला ३ मुली व ४ मुले असून पती कोरोना काळात मयत झाला आहे. तिच्या व मुलांच्या उपजीविकेचे साधन नसल्याने ती महिला इच्छुक लोकांना मुले देण्याच्या प्रयत्नात होती. हे कृत्य करणे बेकायदेशीर असल्याचे तिला समजावले असेल तरी भविष्यात पुन्हा असे घडू नये म्हणून त्या मुलांना जळगांव येथे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. लहान मुलांची खरेदी विक्री करणे हे बेकायदेशीर असून असा प्रकार आढळून आल्यास त्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन अमळनेर पोलिसांनी यावेळी केले आहे.