
अमळनेर:- युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौर्याआधीच शिवसेनेला धक्का बसला असून अमळनेरच्या शहरप्रमुखांसह महत्वाच्या पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे.
काल अमळनेर तालुक्यातील पदाधिकार्यांनी आपापले राजीनामे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द करून ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. अमळनेर येथील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कौतिक पाटील, अमळनेर सरपंच संघटनेचे तालुकाअध्यक्ष व सुंदरपट्टी लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील, तालुका संघटक महेश देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला. तत्पूर्वी शहर प्रमुख संजय पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचेकडे सादर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केल्याची जाहीर केले. गुलाबभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी संजय कौतिक पाटील व महेश देशमुख ,लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.







