40 ते 50 जण अवैधपणे बसवतात एकाच वाहनात…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा व परिसरातील गावांमध्ये मध्य प्रदेशातील आदिवासी समाजातील मजूर कामानिमित्त रोज येत असून माल वाहतूक करणाऱ्या पिकअप गाड्यांमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास शेतमजूर भरगच्च कोंबलेल्या गर्दीने प्रवास करत असून तो अवैधरित्या असणारा प्रवास शेत मजुरांवर उठला तर मोठी जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची जबाबदारी कोण घेईल यालाही प्रश्नचिन्ह असणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पातोंडा हे लोकसंख्येच्या मानाने मोठे असून याठिकाणी शेती हा प्रामुख्याने प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे. पातोंडा सह मठगव्हाण, नालखेडा, रुंधाटी, दापोरी आदी गावांत देखील मजूर मागणी जास्त असते. पावसाळा म्हटले की, शेतकऱ्यांना शेतीची मशागत ओढ असते. पडणारा पाऊस आणि आपल्या शेतीची सर्व मशागत पूर्ण करण्यासाठी जो तो शेतकरी धावपळ करीत असतो. मग टंचाई भासते ती शेत मजुरांची. खरीप हंगामात कापूस हे मुख्य पीक असते त्यामुळे निंदणी साठी मजूर भेटणे हे जिकरीचे असते.परिणामी मजुरी वाढते. वाढीव मजुरी देऊनही मजूर न भेटल्याने शेतीची कामे रखडतात.यासाठी शेतकरी बांधव मध्य प्रदेशातून दरवर्षी आदिवासी समाजातील मजूर मागवीत असतात. कमी मजुरी व झटक्यात काम म्हणून ह्या मजुरांची आवक होते.आता निंदणी व जून महिन्यातील लागवड केलेल्या कापसाची वेचणी सुरू झाल्याने पातोंडा व परिसरातील गावांमध्ये मजुरांची टंचाई भासत आहे.त्यामुळे मध्य प्रदेशातून पिकअप वाहनांमधून रोजनिशी चाळीस ते पन्नास जणांचा समुदाय गाडीच्या छतावर, टपावर,दोरीवर बसून, फाटकांना लटकून,उभे राहून जीवघेणा प्रवास करीत आहे. यामध्ये तरुण व किशोरवयीन मुलां-मुलींचा समावेश जास्त दिसून येतो. असा जीवघेणा प्रवास ह्या गरीब आदिवासी समाज बांधवांतील मजुरांवर बेतला तर होणाऱ्या जीवितहानीस कोण जबाबदार असणार ? मध्य प्रदेशातून अशी अवैध प्रवाशांची वाहतूक येतेच कशी ? ह्या अवैध वाहतुकीला कोण जबाबदार आहे असा प्रश्न साहजिकच पडत आहे. शेतकऱ्यांना मजूरांची आवश्यकता आहेच आणि ती वास्तविकता आहेच. रस्ते अपघात कोणत्या न कोणत्या कारणाने होत असतात. हा अवैधरित्या होणारा मजूरांचा जीवघेणा प्रवास मजुरांवर बेतला तर होणाऱ्या घटनेस कोण जबाबदार असणार असा प्रश्न साहजिकच सुज्ञ नागरिकांना पडत आहे.