अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे दि. 15 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत श्रावण देसले अध्यक्षस्थानी होते. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.व्हि.डि.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ; यात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचन सवयी संस्कृतीबद्दल आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही.एस. देसले यांनी मनोगत व्यक्त करताना वाचन संस्कृती वाढवली पाहिजे.शरीर सुदृढ होण्यासाठी जसे व्यायामाची आवश्यकता असते तसेच मन आणि मस्तिक सक्षम ठेवण्यासाठी वाचनाची गरज असते, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा.विजय पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.