
चौबारी गावाजवळ घडली घटना, तिघे जखमी…
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी गावाजवळ सिमेंटने भरलेल्या गाडीने धडक दिल्याने पिकअप चारीत उतरून तिघे जखमी झाल्याची घटना दिनांक १४ रोजी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडसे येथील श्रावण गव्हाणे, तसेच त्यांच्या भाऊ भाईदास गव्हाणे, पुतण्या रघुनाथ गव्हाणे व प्रेमराज पाटील हे अमळनेरहून गावाकडे बोलेरो पिकअप वाहनाने जात असताना चौबारी गावाच्या पुढे पॉली हाऊस जवळ समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनाने बेजबाबदारपणे गाडी चालवत कट मारण्याचा प्रयत्नात मागील भागाची धडक पिकअपला दिल्याने सदर वाहन सरळ रस्त्यालगत चारीत फेकले गेले. गाडीत मागे बसलेला रघुनाथ गव्हाणे हा रस्त्यावर फेकला गेला. तसेच केबिन मध्ये बसलेले श्रावण गव्हाणे,भाईदास गव्हाणे, व प्रेमराज पाटील यांना मार बसला. सिमेंटच्या गाडीचा चालक पळून जाण्याचा प्रयत्नात असताना इतर प्रवाश्यांनी त्यास पकडुन आणले असता त्याने त्याचे नाव भगवान रवींद्र सपकाळे रा. कासावा ता यावल असून तो या वाहनाने वंडर सिमेंटची वाहतूक करत असल्याचे सांगितले. भाईदास गव्हाणे व रघुनाथ गव्हाणे यांना जास्त मार लागल्याने धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात करण्यात आले. याप्रकरणी सदर चालकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. सचिन निकम करीत आहेत







