
मांजर्डी येथे गळफास घेत एकाने संपविली जीवनयात्रा…
अमळनेर:- तालुक्यात १४ रोजी दोन वेगवेगळ्या घटनेत अकस्मात मृत्यूच्या घटना घडल्या असून मृत्यूची नोंद अमळनेर पोलिसांत करण्यात आली आहे.

तालुक्यातील मांजर्डी येथे एकनाथ चंदनशिव (वय ५०) या इसमाने घराच्या छताला प्लास्टिकची वायर लटकवून गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटना त्यांचा चुलत भाऊ विश्वास चंदनशिव (वय ६०) यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी अमळनेर पोलिसात खबर दिली. त्यानुसार अमळनेर पोलिसांत अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनिल जाधव करीत आहेत.
तर तालुक्यातील दहिवद येथील किशोर साहेबराव पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत त्यांच्या सालदाराचा मृतदेह आढळून आला. दहिवद येथील शेतकरी किशोर पाटील यांच्याकडे राजू मांगिलाल पावरा (वय ३०) हा सालदार म्हणून काम करत होता. तो अधूनमधून परस्पर घरी निघून जायचा. १२ रोेजी दुपारी ०१.३० वाजता किशोर पाटील सालदार राजूसाठी शेतात जेवणाचा डबा घेऊन गेले असता त्यांना तो शेतात आढळून आला नाही. त्यांच्यामते तो पुन्हा घरी गेला असेल, असे त्यांनी मत वर्तविले आणि ते परत घरी येऊन गेले. १४ रोजी ११.३० च्या सुमारास पाटील जेव्हा स्वत: विहिरीतील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना त्यांचा सालदार राजू पावरा याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळला. त्यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोेलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार संदेश पाटील करीत आहेत.