संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा.डॉ. मोमाया यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- भारतीय संस्कृतीतील जीवन विषयक मुल्यांचा समावेश व नागरिकांना हक्कासोबतच कर्तव्यांची जाणीव करून देणारे भारतीय संविधान हे अद्वितीय आहे. राज्य घटनेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ. ललित मोमाया यांनी केले. संविधान दिनानिमित्त मराठी वाड़मय मंडळ व सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान पूजन व व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक प्रकाश ताडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा.डॉ.मोमाया म्हणाले की, घटनेची निर्मिती करतांना घटनाकारांनी शासन,प्रशासन व नागरिक यांच्या अधिकारात समतोल साधला आहे. नागरिकांना जसे घटनेने हक्क प्रदान केले आहेत तसेच कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. कुणालाही अमर्याद अधिकार नाहीत तसेच नागरिकांच्या हक्क व अधिकाराचा संकोच होणार नाही याचीही काळजी राज्यघटनेत घेण्यात आली आहे. तसे केले नसते तर देशात अराजकता माजली असती. त्यांनी घटनेची नागरिकांच्या जीवनातील आवश्यकता,घटनेची विविध वैशिष्ट्ये,काळाच्या आवश्यकतेनुसार घटनेत मुळ ढाचा अबाधित ठेवून होत असलेले परिवर्तन,नागरिकांची जबाबदारी याबाबत अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान फार मोलाचे आहे. अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून सर्वसमावेशक भारतीय संविधान तयार करण्यात आले आहे असेही प्रा.डॉ.ललित मोमाया म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना व जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रतिमापूजन व संविधान पूजन करण्यात आले. दिनेश नाईक यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधानाचे महत्व विशद केले व संविधानाचा अभ्यास गरजेचा आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र निकुंभ यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.श्याम पवार व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.पी.बी.
भराटे यांनी केले. कार्यक्रमास म.वा.मंडळाचे कार्यकारी मंडळ, समरसता मंचाचे कार्यकर्ते व रसिक श्रोत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.