उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर यांचा अनोखा उपक्रम…
अमळनेर:- वाचन संस्कृतीचे जतन संवर्धन व वृद्धिंगत करण्यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्यांनी वर्ग ग्रंथालय योजना सुरू केली आहे. त्यानंतर त्यांनी वाचकवीर स्पर्धा घेतली.
सध्या व्हाट्सअप फेसबुकच्या जमान्यात विद्यार्थी वाचनापासून दुरावलेले जाणवतात. त्यांच्यातील वाचनाविषयीचे नैराश्य झटकून त्यांना वाचनाला प्रवृत्त करण्यासाठी वर्ग ग्रंथालय योजनाही प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी वाचायला लागले आहेत. त्यांची विचार प्रक्रिया गतिमान झालेली आहे. स्वतःचा विचार विद्यार्थी स्वतः करून इतरांना वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत. इतर विद्यार्थ्यांनाही यातून प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थी खरोखर वाचतात का याचा पडताळा प्रबोधनदूत धनगर हे घेत असतात.
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे वाचकवीर स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत प्रथम दुर्गेश ईश्वर पाटील, द्वितीय प्रतीक भरत कड, तृतीय विवेक परमेश्वर निकम यांनी क्रमांक पटकावले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव संदीप घोरपडे, अध्यक्ष हेमकांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे तसेच डी ए धनगर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.