खान्देशासह परराज्यातील भाविकांची दर्शनासाठी होणार गर्दी…
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा येथील लघुमाहिजी देवी यात्रोत्सवास सुरुवात दि. ५ जानेवारीपासून होत असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लघुमाहिजी देवीच्या यात्रोत्सवाला सुरवात होणार असून परिसरातील हजारो भाविक यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतात. गावापासून उत्तरेस उंच कळस असलेले सुंदर लघुमाहिजी देवीचे भव्य पुरातन मंदिर आहे. मंदिरात अखंड दगडावर कोरीव सिंहावर आरूढ असलेली देवीची भव्य मूर्ती आहे. ही देवी आजही सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप म्हणून ओळखली जाते. परिसरात नव्हे तर खानदेशात या देवीला फार महत्त्वाचे स्थान आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की, फार प्राचीन काळात देवीच्या मंदिराच्या जागेवर एक मोठा वडाचा वृक्ष होता. या वडाच्या वृक्षाखाली उदासी नावाच्या तपस्वी महाराजांची पर्णकुटी होती. सभोवताली झाडाझुडपांसह पडीक शेतजमीन होती. या शेतजमीनीची मशागत करीत असताना एका शेतकऱ्याला त्रिशूळ आकाराच्या दगडाचे तीन सुरेख असे बाण सापडले. सप्तशृंगी देवीला सात बहिणी होत्या. त्यापैकी सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी असे होते. ती सर्वांत लहान असल्याने या देवीला ‘लघुमाहिजी’ असे संबोधले जात असे. या देवीच्या हातात दगडाचा त्रिशूलाच्या आकाराचा बाण होता, या बाणालाच पूर्वी लघुमाहिजी म्हणून ओळखत असे, अशी आख्यायिका पर्णकूटीत वास्तव्यात असलेले उदासी महाराज सांगत असत. तेव्हापासूनच देवीला ‘लघुमाहिजी देवी’ म्हणून ओळखू लागले अशी माहिती गुरव घराण्यातील देवीचे सेवेकरी कृष्णा गालापुरे सांगतात.
देवीचे मंदीर बांधकामासाठी कै भिकारी शेटे यांनी आपल्या स्वमालकीच्या जमीनीतून जमीन दान दिलेली आहे. दानशूर प्रतापशेठजी यांनी देवीचे त्यावेळी सुंदर कळस असलेले मंदिर बांधून दिले आहे. मंदिराच्या आवारात परशुरामाचे मंदिर आहे. मंगल कार्यालयही आहे. मंदिराच्या बांधकामासाठी (कै.) जगन्नाथ वामनराव ठाकूर यांनी निधी जमा करून बांधकामाला अग्रक्रम दिला तर देवस्थानचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दिनेश बिरारी, सचिव भुषण बिरारी , विश्वस्त प्रशांत बोरसे, दिपक सुर्यवंशी, सुरेश पालखे, रावण बाविस्कर, प्रविण पवार, धर्मदास चौधरी व नरेंद्र सैंदाणे आदींनी मंदिर देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्र योजनेअंतर्गत 2008 मधे क वर्ग तर 2022 मधे ब वर्ग दर्जा प्राप्त होण्यात योगदान देत मंदिर परिसराची शोभा वाढविली आहे. गेल्या आठ दिवसांपासून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेत विविध खाद्य पदार्थ्यांच्या दुकानासह संसारोपयोगी वस्तूची दुकाने थाटलेली असतात. यात्रेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. पौष शु. चतुर्दशीला मानलेला नवस फेडण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. देवीला नैवेद्य म्हणून वरण व रोडग्याचा प्रसाद अर्पण केला जातो तर पौर्णिमेच्या दिवशी भाविकांच्या योगदानातून गुळाचा शिरा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याचे कार्यक्रम होतात. देवीचा मान म्हणून प्रत्येक गल्लीतून दरवर्षी तगतरावांची मिरवणूक काढली जाते.
दैनंदिन कार्यक्रम ५ जानेवारी रोजी आई भगवती पालखीची नगर प्रदक्षिणा (वेळ – सकाळी ७:३० ते १२.००), दि. ६ जानेवारी रोजी आई भगवती यात्रोत्सव व महाप्रसाद (वेळ -सकाळी ९:०० ते संध्या ६:००), दि. ७ जानेवारी (शनिवार) आई भगवती उत्तर यात्रोत्सव असा असून सर्व भाविकांना, हरिपाठ महिला मंडळ, तरूण तरुणी व अबालवृध्द यांनी दि. ५ जानेवारी रोजी टाळ, मृदंग व भजनी मंडळाच्या सोबतीने आई भगवती माहिजी देवी पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावे अशी विनंती तिर्थक्षेत्र श्री माहिजी देवी देवस्थान पातोंडा मार्फत करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया –
“यात्रोत्सवात खान्देशासह, गुजरात व मध्यप्रदेश मधील भाविक दर्शनाकरीता येतात. माहिजी देवी पातोंडासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तिर्थक्षेत्र माहिजी देवी देवस्थानला शासनाने ब वर्ग दर्जा प्रदान केल्याने भाविकांमधे उत्साहाचे वातावरण आहे.”
– प्रशांत बोरसे, विश्वस्त माहिजी देवी देवस्थान, पातोंडा