पर्यायी रस्ता, पुनर्वसनासह इतर प्रश्न अद्याप प्रलंबितच…
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथील ग्रामस्थ प्रजासत्ताक दिनी पाडळसरेच्या जलसाठ्यात जलसमाधी घेणार असल्याबाबतचे निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी दिले.
सात्री गावाला पर्यायी रस्ता नसल्याने पावसाळ्यात उपचाराअभावी दोन बळी गेले आहेत. प्रशासकीय अधिकारी दर वेळी पाहणी करून जातात मात्र प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पूरपरिस्थितीत उपचाराअभावी दोन्ही मयतांच्या वारसांना अद्याप मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळाली नाही. गृह संपादन प्रस्ताव क्र. २१७/२०१८ सात्री गावठाण संपादनाचा कामाला गती मिळत नाही. पुनर्वसन गावठाण मधील भूखंड वाटपच्या शासन स्तरावर प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थ व्यथित झाले असून येत्या प्रजासत्ताकदिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या जलसाठ्यात ग्रामस्थांसह जलसमाधी घेणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सात्रीचे माजी सरपंच व जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे सदस्य महेंद्र शालिग्राम बोरसे यांनी सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. यानंतर प्रशासनाकडून कोणती पाऊले उचलली जातात तसेच प्रश्न सुटण्यास मदत होईल की परत आश्वासनांवरच बोळवण केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.