
अनैतिक संबंध उघड होवू नये म्हणून पोटच्या पोराचा केला होता खून…
अमळनेर:- चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे अनैतिक संबंध उघड होवू नये म्हणून १३ वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या आईसह भाच्याला जन्मठेपेची शिक्षा अमळनेर न्यायालयात काल सुनावण्यात आली.

चोपडा शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी गिताबाई दगडू पाटील (वय 35) व आरोपी संभा उर्फ समाधान विलास पाटील (25 वर्षे) रा. चहार्डी ता. चोपडा यांना सन २०१९ मधील केलेल्या खून प्रकरणी न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी गिताबाई दगडू पाटील व तिचा भाचा समाधान विलास पाटील यांना मयत मंगेश दगडू पाटील याने अनैतिक संबंध ठेवताना पाहिले. व हे पप्पांना सांगून देईल असे म्हटल्याने आई गिताबाईने बाजुला पडलेल्या काठीने मुलगा महेश याच्या डोक्याच्या मागील बाजुस मारल्याने तो बेशुध्द झाला. त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबुन आरोपी समाधान याच्या घरात मंगेशचे शव लपवुन ठेवले. व त्यानंतर रात्री 12.00 वाजेच्या नंतर दोघांनी मयताच्या मृतदेहाचे तुकडे करून काही तुकडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला व बनाव दाखविला की, मयतास कोणीतरी अज्ञाताने अपहरण करुन नरबळी देण्यात आला आहे. त्यावरून मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद मयताचे वडील दगडू लोटन पाटील यांनी दिली होती. मात्र गीताबाई व समाधान यांची स्वतंत्र चौकशी केली असता संशयास्पद गोष्टी उघड झाल्याने पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी अनैतिक संबंध उघड होवू नये म्हणून खून केल्याचे कबूल केले. न्यायालयात आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम 302, 201 व 34 प्रमाणे दोषारोप ठेवण्यात आला. सदर कामी मा. जिल्हा न्यायाधीश पी.आर. चौधरी यांच्या पुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारी वकील ॲड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी कामकाज पाहिले. सदर खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यातील सरकारी पक्षातर्फे गिताबाईचे पती दगडु लोटन पाटील तसेच बहीण प्रतिभा दगडू पाटील, प्रदिप कुलदिप पाटील, डॉ. निलेश देवराज, डॉ. स्वप्नील कळसकर, ‘श्वान पथक जळगांव व तपासणी अधिकारी मनोज पवार, ए. पी.आय., योगेश तांदळे यांनी प्राथमिक तपास केला. तदनंतर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पुढील तपास केला. सदर खटल्यात मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दंड रुपये 300/- दंड तसेच दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावास, तसेच भा.द.वि. कलम 201 प्रमाणे दोन वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सदर दोन्ही आरोपी त्यांचे अटकेपासून कारागृहात होते. या कामी ए.एस.आय. उदयसिंग साळुंके, पो. ना. हिरालाल पाटील, पो. कॉ. नितीन कापडणे, हवालदार हरीश तेली, यांनी काम पाहिले.




