द्रौ.रा.कन्याशाळेत विद्यार्थिनींनी बनविल्या कापडी व कागदी पिशव्या…
अमळनेर:- अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दि.१ एप्रिल २२ ते ३१ मार्च २०२३पर्यंत माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत अमळनेर शहरातील शाळांमध्ये विदयार्थ्यांना अभियानाबाबत माहिती देणे व जनजागृती करणे सुरू असून त्याअंतर्गत श्रीमती द्रौ.रा. कन्याशाळेत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगरपरिषदेचे युनूस शेख यांनी विद्यार्थ्यांना घरातील ओला व सुका कचरा कसा ओळखावा ? तसेच तो कचरा वेगवेगळा कसा जमा करावा ? डम्पिंग ग्राउंड जवळील गांडूळ खत प्रकल्पाची माहिती, वृक्ष लागवड करून संवर्धन करणे बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या कागदी व कापडी पिशव्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी यांनी सन २०२२ पासून आपली शाळा या अभियानाशी कशी जोडली गेली हे सांगून माझी वसुंधरा अंतर्गत शाळू मातीचे गणपती बनविणे, कापडी पिशवी बनविणे, वृक्ष लागवड कशी केली याबाबत माहिती दिली.नगर परिषदेच्यावतीने श्रीमती द्रौ.रा. कन्याशाळेला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षक डी.एन.पालवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. प्रतिभा शेवाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे नोडल ऑफिसर संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील,संतोष बिऱ्हाडे, युवराज चव्हाण,अनंत बिऱ्हाडे व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. नंतर द्रौ.रा.कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी बनविलेल्या कापडी व कागदी पिशव्या अमळनेर शहरातील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विकणाऱ्यांना वाटप करण्यात आल्या. त्यावेळी शाळेच्या या उपक्रमाचे नागरिक सर्वत्र कौतुक करताना दिसले.
प्रतिक्रिया:-
अमळनेर शहरातील सर्व संस्थांनी स्वछता सर्वेक्षणात सहभागी होऊन नगर परिषदेच्या उपक्रमात सहभागी व्हावे. आपल्या वाढदिवशी झाडे लावावे व त्यांचे संवर्धन कसे होईल यावर लक्ष द्यावे.
:- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी
अमळनेर नगरपरिषद