पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट घेत सोडवले उपोषण….
अमळनेर:- अमळनेर मेन्स टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने सुरू केलेले उपोषण पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मध्यस्थीने सुटले आहे.
महाराष्ट्र शासनाने महिलांना बस प्रवासात 50% प्रवास सवलत जाहीर केल्याच्या निषेधार्थ अमळनेर मेन्स टॅक्सी चालक-मालक संघटना पदाधिकारी हे दि. 23 मार्च पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. त्यानंतर काल २५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची स्वतः भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांना तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो असे आश्वासन देत समजूत घालून उपोषणकर्ते यांचे बेमुदत आमरण उपोषण सोडविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय शिंदे व नायब तहसीलदार लांडगे यांनी मेन्स टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्रित रित्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.