
अमळनेर:- जलसंधारणाच्या कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल मारवडचे रहिवासी तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे व सहकारी इंजिनियर विजय भदाणे, राकेश गुरव यांना जलप्रहरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे खासदार गोपाळ शेट्टी, खासदार उन्मेष पाटील, गोपाल आर्य, बी. के. आशा दीदी आणि नेदरलँड, फिनलंड, माल्टा, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तानसह अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. जलसंपदा मंत्रालय आणि जल जीवन मिशन आयोजित या सोहळ्यात देशभरातील २२ राज्यांतील जलयोध्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील संदीपकुमार साळुंखे, अजित पवार, राजेश पंडित, दत्तू रामभाऊ ढगे, रवींद्र सिंघल, अभिजित राऊत, नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्यासह आदींचा समावेश आहे. रूट चळवळी अंतर्गत मारवड व परिसरात विकास मंचाच्या माध्यमातून चळवळ उभी करून जलसंधारणाची भरीव कामे केल्याने ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.







