अमळनेर:- येथील पीबीए इंग्लिश मीडियमच्या रोटरी क्लब हॉलमध्ये कवयित्री रेखा वाल्मिक मराठे यांच्या ‘चतुरंग’ व ‘फुला मुलांची शाळा’ या दोन काव्य संग्रहांचे दिमाखात प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित झाले.
या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी तथा डाएटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मराठी वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.सदाशिव सूर्यवंशी, कवी व साहित्यिक अशोक कोळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानदेश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.कुणाल पवार यांनी केले. डाएटचे अधिव्याख्याता डॉ.दशरथ साळुंखे यांनी कवयित्री सौ.रेखा मराठे यांचा परिचय करून दिला. साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी ‘फुला मुलांची शाळा’ या काव्यसंग्रहाचा परिचय करून दिला. तर पूजा शहा यांनी ‘चतुरंग’ या काव्यसंग्रहाचा परिचय करून दिला. कवयित्री सौ.रेखा मराठी यांचे पती वाल्मीक मराठे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी दोघेही काव्यसंग्रहाचे रसग्रहण अत्यंत सुलभरीत्या प्रेक्षकांना करून दिले. कवी अशोक कौतिक कोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. निळकंठ गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रेक्षकांना मनोरंजनात्मक शैलीने काव्य आणि कवी यांच्या संबंध सांगितला. ते म्हणाले, ‘कवितेतील शब्द हे हलके फुलके असले पाहिजेत, जे सामान्य वाचकालाही समजतील आणि रेखा मराठे यांची कविता आणि त्यांचे शब्द अतिशय साधे सोपे आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर नेरकर दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण बाविस्कर, रत्नाकर पाटील, उमेश काटे, श्रीमती पूनम साळुंखे, रत्ना भदाणे, रजनी पाटील, नुतन पाटील क्रांती साळुंखे, पाकिजा पिंजारी यांनी सहकार्य केले. खानदेश साहित्य संघाचे सचिव शरद यांनी यांनी सूत्रसंचालन केले. तर अध्यक्ष सुनीता पाटील यांनी आभार मानले.