
11 जागांवर माविआ, 4 जागा भाजपा व एका जागेवर अपक्षाने मारली मुसंडी…
अमळनेर:- तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला असून एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

सकाळी १० वाजेपासून व्यापारी लायब्ररीत मतमोजणीला सुरुवात झाली. सोसायटी मतदारसंघात सात जागांसाठी स्मिताताई वाघ, अशोक पाटील व सुभाष जीभाऊ हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. स्मिता वाघ ७२६, अशोक आधार पाटील ७२१, प्रा. सुभाष पाटील ६५६, सुरेश पिरण पाटील ५०७, डॉ. अशोक एच. पाटील ४२१, नितीन बापूराव पाटील ४०९, भोजमल पाटील ३९४ असे मविआचे पाच, एक भाजपा, व एक अपक्ष उमेदवार निवडून आले. महिला राखीव प्रवर्गात सुषमा देसले ६३४, पुष्पा पाटील ५९३ ह्या मविआच्या उमेदवार विजयी झाल्या. एनटी प्रवर्गात समाधान धनगर हे ६०३ मत तसेच ओबीसी प्रवर्गातून डॉ. अनिल शिंदे हे ७२२ मते मिळवून विजयी झाले. ग्रा. पं. जनरल मतदारसंघात प्रफुल बापू पाटील ५०६, सचिन पाटील ५१० मते व आर्थिक दुर्बल प्रवर्गात हिरालाल पाटील ४८१ मते मिळवून विजयी झाले. अनु.जा.ज. प्रवर्गात भाईदास भील ४३३ मते व हमाल मापाडी संघातून शरद पाटील १९५ मते मिळवून विजयी झाले. मविआने ११ जागांवर, भाजपने ४, व एका अपक्षाने विजयी मुसंडी मारली आहे. आदी बिनविरोध झालेल्या व्यापारी प्रवर्गातून निवडून आलेल्या संचालकांनी व एका अपक्षाने मविआला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमदारांच्या नेतृत्वात बाजार समिती ताब्यात घेवून भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. आता सभापती पदासाठी काहींनी फिल्डींग लावणे सुरू केले असून समर्थकांनी आधीच सोशल मीडियावर जयघोष सुरू केला आहे. या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून स्मिताताई वाघ यांना मिळालेली सर्वाधिक मते ही चर्चेचा विषय ठरली असून त्या तुलनेत त्यांच्या इतर उमेदवारांना मात्र अगदी नगण्य मते मिळाली आहेत. विजयानंतर आमदार अनिल पाटील, विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला.







