अमळनेर:- आता सर्वत्र ऑनलाइन आल्यावर प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांचे निकाल ऑफलाईन लागत आहेत. मात्र पातोंडा येथील रहिवासी व सध्या चोपडा येथील प्रताप विद्या मंदिर (प्राथ.विभाग) येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले सागर सुरेश भदाणे यांनी आपल्या इयत्ता- ३री च्या वर्गाचा निकाल आॕनलाईन पद्धतीने लावला असून नवीन पायंडा पाडला आहे. त्यांच्या या आॕनलाईन निकालाचे पालकवर्गाकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
सागर भदाणे हे सन २०१० पासून चोपडा शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिर (प्राथ. विभाग) चोपडा येथे शिक्षक या पदावर काम करत आहेत. ते तालुक्यातदेखील तंत्रस्नेही शिक्षक म्हणून नावारूपाला आहेत. त्यांना शाळेच्या सरल, यु-डायस, शाळासिद्धी व इतर शैक्षणिक आॕनलाईन कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नको आता ऑफलाईन, व्हा आता आॕनलाईन या वाक्यानुसार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांना संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.