निम येथील घटना, दुःख चेहऱ्यावर न उमटू देता पार पाडला विवाह…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील काबाळकष्ट करणारे दाम्पत्य सरलाबाई गुर्जर व गुलाब सुपडू गुर्जर यांनी घाम गाळून मुलगा व मुलीला उच्च शिक्षित करून मुलाला अभियंता केलं, मुलीला पदवीधर केले, मुलीचे लग्न झाले मात्र मुलाला नोकरी लागताच आई सरलाबाईला कर्क रोगाने ग्रासले.
गेल्या वर्षभरापासून आईची प्रकृती चिंताजनक झाली म्हणून माझ्या मुलाचे लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हायला हवं म्हणून पती गुलाब गुर्जर यांचाकडे भावना व्यक्त केली आणि गुलाब गुर्जर भाऊ राजेंद्र पाटील यांनी मुलगा बांधकाम अभियंता असलेल्या राकेशसाठी मंगरूळ ता चोपडा येथील शेतीनिष्ठ परिवारातील अशोक गंगाधर पाटील यांची सुकन्या एमएस्सी शिक्षण पूर्ण केलेल्या रोहिणीशी लग्न जोडून दिनांक ३ रोजी हळद व दिनांक ४ रोजी १०:३० वाजता विवाह सोहळा करण्यात येणार तोवर लग्न दोन दिवसावर असताना आई सरलाबाईला त्रास जाणवू लागला म्हणून अमळनेर येथील डॉक्टर बहुगुणे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांना नातेवाईकांनी लग्नाची कल्पना देऊन ठेवली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. दिनांक ३ रोजी देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्याआधी वर मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात अंथरुणावर असलेल्या आई सरलाबाईचे आशीर्वाद घेतले. आई सरलाबाईने नववधू वर मुलाला जोडीत पाहून प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन बेटा नाराज राहू नको. मी लवकर उठून उभी राहील काळजी करू नको. सून रोहिणीला अष्ट पुत्र सौभाग्यवती म्हणून पाठीवरून दोन्हींच्या हात फिरवून सुनेचा व मुलाचा मुका घेतला आणि हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जा सांगून रुग्णालयातूंच शेवटचा निरोप घेतला. डॉक्टरांनीही सरलाबाईला प्रसन्न पाहून सुटकेचा निश्वास सोडला. मुलाला हळद लागत असताना व्हिडीओकॉलने पाहून पाणी मागितले, शेवटी हळद लागली पाहून सरलाबाई डॉक्टरांनी सांगितले की आता माझी इच्छा पूर्ण झाली, मला चिंता नाही म्हणून सायंकाळी ७:१० ला या जगातून कायमचा निरोप घेतला. लागलीच रुग्णालयात उपस्थित नातेवाईकांनी जेष्ठ कर्त्या निवडक कुटुंबियांना व गावातील भावबंध यांना सरलाबाईच्या निधनाची वार्ता कळविली. मात्र विवाह सोहळा संपन्न होणार असल्याने व वर वधू कडील नातेवाईक लग्न सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित असताना सरलाबाईच्या निधनाचे दुःख छातीवर दगड ठेवून नवरदेवाच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी संयम ठेवून धीर देत चेहऱ्यावर मिथ्या हसु आणून हृदयात दुःख साठवून लग्न सोहळा वेळेवर संपन्न केला. मात्र वरराजा राकेशला मनोमन कल्पनाही करवत नाही असे दुःख त्याला लग्न झाल्यावर कळले आणि टाहो फोडत आई तुझी इच्छा पूर्ण केली मात्र मला आताच तू कायमस्वरूपी सोडून गेली म्हणून हंबरडा फोडला. शेवटी वडील काका व नातेवाईकांनी व कपिलेश्वर संस्थेचे सचिव मघन पाटील, हभप छोटू पाटील, डॉक्टर एल डी चौधरी, हभप लोटन अण्णा, मधुकर चौधरी यांनी धीर देत, दुपारी १२ वाजता मृत सरलाबाईचा मृतदेह गावी आणून १२:३० वाजता गावी अंत्यसंस्कार केले. तालुक्यात निम येथील घटनेचीच चर्चा होत होती.