जुन्या पोलिस वसाहतीच्या जागेचा तिढा सुटेना, १२ जूनचा आमदारांनी दिला अल्टिमेटम…
अमळनेर:- येत्या पंधरा दिवसात जुन्या पोलिस वसाहतीची जागा खाली करून प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला सुरुवात न केल्यास आता आमदार अनिल पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
शहरातील जुन्या पोलिस वसाहतीच्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी निधी मिळाला असून कार्यारंभ आदेश ही देण्यात आला आहे. या ठिकाणी प्रांत कार्यालय, तहसिल कार्यालय यांच्यासह विविध प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक सर्व मंजुरी ही मिळाली आहे. मात्र पोलिस विभागाला जागा खाली करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी व उच्च न्यायालयाने दिला मात्र पोलीस विभागाकडून त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी आता १२ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून कामाला सुरुवात न झाल्यास तालुक्यातील नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे यावर पोलीस प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.