
विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या राहणार उपस्थिती…
अमळनेर:- येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवारी अर्थात १ जूनला विविध भूमिपूजन, लोकार्पण व समाजाभिमुख उपक्रमांचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्री कालभैरव व त्यांची पत्नी माता श्री जोगेश्वरी यांचे एकत्रित मंदिर होणार आहे. मंदिरातील उंबराच्या झाडाखाली श्री गुरुदत्ताचे मंदिर होणार आहे. दोन्ही मंदिरांचे निर्माण विश्वात एकमेव ठरेल अशा पद्धतीचे असणार आहे. सर्व मूर्तीही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतील. या मंदिरांच्या नियोजित जागेचे भूमिपूजन संतश्री प्रसाद महाराज यांच्या परमपवित्र उपस्थितीत व पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी श्री गणेश व श्री विष्णू महापूजनाचा विधी आय. एम. ए. संघटनेचे माजी आंतरराष्ट्रीय खजिनदार डॉ. रवी वानखेडकर (धुळे) व धुळे येथीलच ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण मोरे यांच्या शुभ हस्ते होईल. यावेळी अयोध्या येथील आर्किटेक्ट सर्वज्ञ चितापूरकर यांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शालेय विद्यार्थ्यांना सेलो वॉटर बॉटल्स वाटप, पत्रकार व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या बांधवांना विमाकवच देणे आणि सायरनचे (भोंगा) लोकार्पण होईल. यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, स्मिताताई वाघ, शिरीष चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रम मंदिर प्रांगणात दुपारी बारा वाजता होईल. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.
