अमळनेर बसस्थानकावरील घटना, हे.कॉ. निंबा शिंदे यांची सतर्कता…
अमळनेर:- बसस्थानकावर एका महिलेचे बस मधील हरवलेले पावणे तीन लाख रुपये सतर्क पोलिसामुळे परत मिळाले असून काल दुपारी ही घटना घडली आहे.
चोपडा तालुक्यातील संगीता ताराचंद सोनवणे ही महिला नाशिक चोपडा बस मधून चोपड्याकडे जात होती. अमळनेर बसस्थानकावर पाणी पिण्यासाठी खाली उतरली. परत आल्यावर बॅग पाहिली असता तिला बॅग दिसली नाही. तिने ताबडतोब बसस्थानकावर कर्तव्यावर असलेल्या हेडकॉन्स्टेबल निंबा शिंदे यांना घटना सांगितली. मात्र महिलेला बॅग धुळे ,अमळनेर की अन्य कुठे चोरली गेली हे आठवत नव्हते. शिंदे यांना शंका आली. त्यांनी लागलीच बसस्थानकात फेरफटका मारून चौकशी सुरू केली असता त्यांना दोन तीन महिला चार पाच बॅगा घेऊन जात असताना दिसली. शिंदे यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता सारख्या बॅग असल्याने त्यांनी दोन्ही उचलून घेतल्या होत्या. ओळख पटवण्यासाठी शिंदे यांनी संगीता सोनवणे याना पोलीस स्टेशनला नेले. बॅगमध्ये त्यांचे पावणे तीन लाख रुपये जैसे थे होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, स.पो.नि. राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील यांच्या समक्ष संगीता सोनवणे याना त्यांचे पावणे तीन लाख रुपये परत करण्यात आले. व टॅक्सीमध्ये बसवून सुखरूपपणे चोपडा रवाना करण्यात आले. निंबा शिंदे यांच्या तत्परतेबद्दल आणि कार्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.