अमळनेर:- पावसाळ्यापूर्वीच दोन महिन्यांपासूनच शेतकऱ्यांची नवीन ठिबक संच शेतात बसवण्यासाठी धावपळ सुरू असते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून पीएमकेएसवाय अर्थात राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान डीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन साठीचा ड्रॉ निघालेला नाही. तसेच पोखरा अर्थात नानासाहेब कृषी संजीवनी योजना ही अचानक बंद असल्याने या अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या शेतकरी त्यांचे ठिबक संचासाठीचे ऑनलाइन अर्ज भरू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासनाच्या डीबीटी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला शेतीशी निगडित विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यातीलच सूक्ष्म सिंचन योजनांचा मागील मार्च महिन्यांपासून ड्रॉ निघालेला नाही. डीबीटी प्रमाणेच नानासाहेब कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत ज्या गावांचा समावेश आहे. तेथील शेतकऱ्यांना ७५ ते ८० टक्के अनुदानावर ठिबक संच व इतर कृषी योजनांना अनुदान मिळते. मात्र, या आहे. या अंतर्गत नवीन गावांचा समावेश होणार असल्याने पहिल्या टप्यातील गावांमध्ये सुरू असलेली ही योजना अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणून पोखरा योजना सुरु करा तसेच पूर्व हंगामी पिकांची लागवड करणाऱ्या खान्देशातील शेतकरी ठिबक संच अनुदानापासून वंचित आहेत. हे अनुदान बंद असल्याने व्यापारी ही शेतकऱ्यांना रोखीने ठिबक संच घेण्यासाठी सांगण्यात येत आहे. त्यामुळे हंगामाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. तर यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून ३ ते ५ टक्क्यांपर्यंत व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे. त्रस्त शेतकऱ्यांचा विचार करून डीबीटी योजनेअंतर्गत ड्रा पुन्हा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी कृषि आत्मा कमेटी अध्यक्ष सुनील पवार यांनी केली आहे.