अमळनेर येथे मुक्ताई मार्ट उभारले जाणार, आमदारांच्या प्रयत्नांनी निधी मंजूर…
अमळनेर:- ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मंजुरी मिळाली असून धुळे रोडवर पंचायत समिती सभापती बंगल्याशेजारी मुक्ताई मार्ट उभारण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू लागला आहे. विविध प्रकारच्या वस्तू ,नियमित लागणारे खाद्य पदार्थ बनवून रास्त भावात विक्री केले जातात. मात्र महिलांनी बनवलेला माल विक्री करायला जागा नाही , आणि शहरातील महागड्या जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स परवडणारे नाही. म्हणून एकाच ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व बचत गटांसाठी बाजार पेठ उपलब्ध झाली तर महिलांना आपल्या मालाची विक्री करणे सुलभ जाईल. म्हणून ग्रामविकास विभागाच्या निधीतून १३ लाख ४६ हजार रुपये किमतीची ‛मुक्ताई मार्ट’ संकल्पना अमलांत आणली गेली. पंचायत समितीच्या सभापती बंगल्या शेजारी असलेल्या सभागृहात मुक्ताई मार्ट उभारले जाईल. यामुळे तालुक्यातील बचत गटाच्या महिला आपला उत्पादित माल विक्रीसाठी एकाच ठिकाणी आणतील. ग्राहकांना देखील बसस्थानकाच्या शेजारीच एका ठिकाणी विविध वस्तू आणि खाद्य पदार्थ मिळणार असल्याने त्यांची देखील सोय होणार आहे. बाजाराच्या तुलनेत ग्राहकांना वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतील. यामुळे ग्रामीण महिलांची प्रगती होऊन आर्थिक स्तर उंचावणार आहे. आमदार अनिल पाटील यांनी मुक्ताई मार्ट साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी आमदारांचे आभार मानले आहेत.