विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांचे शांतता कमिटीच्या बैठकीत प्रतिपादन…
एक कॅमेरा पोलिसांसाठी या मोहिमअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन…
अमळनेर:- प्रत्येक सोशल मिडियावर पोलिसांची करडी नजर असून व्हाट्सअप ग्रुपवर गोपनीय पोलीस काम करत आहे आणि सायबर यंत्रणा सतर्क आहे, अश्या शब्दात समाजकंटकांना अप्रत्यक्ष इशारा देत नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी अमळनेर येथील शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. शहरात झालेली दंगल आणि आगामी बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती.
आय जी पुढे म्हणाले की तरुण पिढीवर अंकुश राहिलेला नाही. ही पिढी समाजासाठी, देशासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी देखील घातक आहे. वारंवार दंगली झालेल्या शहरात उद्योग संपुष्टात आले आहेत. तसा अमळनेरचा विकास थांबून भकास होईल. दंगलीत कर्तव्यनिष्ठता बजवणाऱ्या डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे कौतुक करून त्यांनी पाच जिल्ह्यात ‛देशाची सुरक्षा, आपली सचोटी , एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या मोहिमेत २०१० कॅमेरे लावल्याचे सांगितले. कॅमेरा हा गुन्ह्यांचा निरपेक्ष साक्षीदार असतो ती साक्ष बदलता येत नाही असेही सांगितले. पोलीस अधीक्षक एम राजकुमार म्हणाले की, लोक विशिष्ट सण आले की विशिष्ट रंगात रममाण होतात. फलक झेंडे लावणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांना हटकण्याची समाजाची जबाबदारी आहे. दंगलीतील निरपराधांची नावे १०० टक्के कमी होतील, असे आश्वासन देखील राजकुमार यांनी दिले. आमदार अनिल पाटील म्हणाले की, दंगल मिटवायला पुढे येणाऱ्या पदाधिकारीचे नावे दंगलखोर म्हणून पुढे येतात. म्हणून आता लोकप्रतिनिधी समाजसेवक पुढे येत नाहीत. निरपराध लोकांना सोडा म्हणजे शांतता समितीची बैठक सफल होईल. पोलिसांची कर्तव्याची जबाबदारी आहे, शांततेची जबाबदारी समाजाची आहे. माजी आमदार डॉ बी एस पाटील म्हणाले की, दंगल नियंत्रणासाठी समाजसेवक पुढे आले पाहिजे, यापुढे मी स्वतः पुढे येईल. माजी आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की, पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण केले आहे. अनेकांच्या घरावर दगड, काठ्या आढळले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावळे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, एलसीबी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे हजर होते. यावेळी अतुल ठाकूर, इम्रान खाटीक, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, ऍड शकील काझी, व्यापारी लालचंद सैनानी, माजी नगरसेवक प्रवीण पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला आयजी बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते एक कॅमेरा पोलिसांसाठी या अंतर्गत धुळे रोड ,आरकेनगर , तहसील कचेरी परिसरात कॅमेऱ्यांचे उदघाटन करण्यात आले. एका पुरस्कारास गैरहजर असलेले पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना अमळनेर येथे पुरस्कार वितरित करण्यात आला. तर सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे दीपक काटे यांचाही प्रमाणपत्र देऊन बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सूत्रसंचालन संजय पाटील तर आभार विजय शिंदे यांनी मानले.