तर जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडे करा तक्रार…
अमळनेर:- पिकविमा नोंदतांना सी एस सी म्हणजे सामूहिक सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूटमार सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. शासनाचा एक रुपयात पिकविमा ही मोहीम राबवली जात असताना सेवा केंद्र सर्रास जादाचे पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे पत्र ५ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक यांना कार्यवाहीचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे. शेतकऱ्यांची लूट केल्यास संपर्क साधावा त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल असे काँग्रेस व शेतकरी संघटनांनी कळविले आहे.
सध्यस्थितीत १ जुलै पासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या पिकांचा पिकविमा काढण्यासाठी पीक पेरणी केलेल्या पिकांचे स्वयं घोषणपत्र, बँकेचे पासबुक, ७/१२ उतारा असे कागदपत्रे सादर करून केवळ एक रुपयात पीक विमा संरक्षण मिळणार असून शेवटची मुदत ३० जुलै अंतिम तारीख दिली आहे. शासनाच्या एक रुपयात पिकविमा ही मोहीम राबवली जात असताना अमळनेर तालुक्यासह शेजारच्या तालुक्यात सामूहिक सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची पिकविमा काढतांना आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. पीक विमा योजनेत शेतक-यांची सहभागाची नोंदणी करतांना आपले सरकार सेवा केंद्र धारकाकडून जादा पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी बाबत शासनाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
सन २०२३-२४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १/- रुपया भरून पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बैंक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४०/- देण्यात येते. या व्यतिरीक्त राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतकऱ्याकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्याबाबत अमळनेर किसान काँग्रेस व शेतकरी संघटना यांनी जनजागृती केली असून ही शेतकऱ्यांची लूट होत असल्याने सोशल मीडियावर पीक विमा संरक्षणबाबत शेतकऱ्यांना जागृत करूनही लूट सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले आहे, त्यात शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक थांबवली नाही तर स्वतः काँग्रेस व शेतकरी संघटना अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल पण शेतकऱ्यांनी ही तक्रार करण्यासाठी पुढे येवून तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांना कळविणे क्रम प्राप्त आहे. पीक विमा काढतांना सामूहिक सेवा केंद्रावर एक रुपया देऊन पीक विमा संरक्षण घ्यावे अतिरिक्त रक्कम मागितली कृषी अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक निबंधक यांच्या कडे तक्रार करावी. अथवा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्याकडे ही याबाबत तक्रार केल्यास पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी कळविले आहे.
एक रुपयात खरीप हंगामातील पीक विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी पिकांची अधिसूचित यादी….
१) कापूस ,२)ज्वारी ,३)बाजरी ,४)उडीद,५) मूग , ६)नाचणी , ७)तूर ,८)मका ,९)भुईमूग ,१०)तीळ , ११)सूर्यफूल , १२)सोयाबीन ,१३)कारळे ,१४) कांदा
प्रधानमंत्री पीक विम्यासाठी लागणारे दस्तऐवज….
१) आधार कार्ड,
२)बँक पासबुक,
३)मोबाईल क्रमांक,
४) ७/१२ उतारा
५) नमुना ८ अ उतारा ,
६)पीक पेरणी केलेल्या क्षेत्रातील पीक पेरा स्वयं घोषणापत्र,
७)पीक निहाय पेरणी केलेले क्षेत्र गुंठेवारी मध्ये किंवा हेक्टरी
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024