मा.जि.प.सदस्या जयश्री पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा…
अमळनेर:- बोगस खते आणि लाल्या व इतर रोगामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली कपाशी पिके करपत असल्याने माजी जि प सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करत तातडीने पंचनामे करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली.
तालुका कृषी अधिकारी श्री ठाकरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. अमळनेर तालुक्यात मंगरूळ, जानवे, नीम, कळमसरे, पाडळसरे यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली असता लाल्या सह इतर अज्ञात रोगामुळे पिके खराब झाली तर काहींनी सरदार नामक बोगस खते दिल्याने त्यांचीही पिके करपली. या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे पंचनामे करण्यासाठी अर्ज दिला होता. मात्र नामदार पाटील हे मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे करण्याबाबत सूचित केले होते. याच पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्षात बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली, सुरवातीला संपूर्ण बाधित क्षेत्राची पाहणी करून जेथे पिके खराब झाली असतील तेथील पंचनामे केल्यानंतर प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.