रनिंग ट्रॅक, इनडोअर हॉल आणि मैदान होणार अत्याधुनिक…
अमळनेर:- गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाला दोन कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने रनिंग ट्रॅक , इनडोअर हॉल आणि काही मैदाने अत्याधुनिक होणार आहेत. अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
अमळनेर तालुका क्रीडा संकुलासाठी खान्देश शिक्षण मंडळाने जागा दिली आहे. सुरुवातीला तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांनी एक कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. त्यात ट्रॅक, हॉल, वॉल कंपाऊंड, लोखंडी जाळ्या आदी काम झाले होते. परंतु २०१४ नंतर एक रुपया ही निधी न आल्याने नऊ वर्षांपासून क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत पडले होते. देखभाल करण्यासाठी कोणी नसल्याने तेथून साहित्याची चोरी तथा लोखंडी कंपाऊंड चोरीला गेले आहे. रनिंग ट्रॅक खराब झाला होता. खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे व संचालक मंडळाने क्रीडा संकुल शासन करत नसेल तर जागेचा ताबा घेण्याविषयी पत्र दिले होते.
मंत्री अनिल पाटील यांनी याकडे लक्ष घालून तालुक्यात अत्याधुनिक क्रीडा संकुल व्हावे व खेळाडूंना प्रगती करण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. सध्या क्रीडा संकुलासाठी दोन कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा करून तालुका क्रीडा संकुलाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून क्रीडा विभागाकडे घेतला आहे. दोन कोटी रुपयात इनडोअर हॉलचे अपूर्ण काम पूर्ण केले जाईल त्यात बॅडमिंटन हॉल दुरुस्ती, फ्लोअरिंग, विद्युतीकरण, टेराफ्लेक्स, बास्केट बॉल काँक्रीट मैदान, त्याच्या बाजूला मुलांसाठी स्केटिंग रिंग, जुना रनिंग ट्रॅक नूतनीकरण, जेष्ठ नागरिकांसाठी कंपाऊंडला लागून वॉकिंग जॉगिंग ट्रॅक,रस्त्याला लागून व्हॉलीबॉलची दोन मैदाने, पाणी पुरवठा, सॅनिटायझेशन आदी सुविधा करण्यात येणार असल्याने पोलीस व आर्मी भरती करणाऱ्या तरुणांसाठी, खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.