तहसीलदारांना सरदार खत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश…
अमळनेर:- निकृष्ट दर्जाच्या खतामुळे कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी ग्राहक न्यायालयात दाद मागावी आणि संबंधित तहसीलदारांना कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे उत्तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमळनेरच्या शिष्टमंडळाला दिले.
अमळनेर तालुक्यात सरदार खतामुळे अनेक शेतकऱ्यांची कापूस पिके कोमेजली आहेत. आणि लाल्या रोगामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. तरी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कंपनी विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, सचिन वाघ, संदीप घोरपडे, माजी जिप सदस्य के डी पाटील या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की निकृष्ट खतामुळे नुकसान ही नैसर्गिक आपत्ती नाही. शासनाने कंपनीविरुद्ध परवाना रद्द ची कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यात शासन स्तरावर मदत देण्याचे नियमात बसत नाही म्हणून शेतकऱ्यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागावी. आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर लाल्या रोगाबाबत कृषी विभागाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कमी जास्त पाण्यामुळे लाल्या रोग येऊ शकतो मात्र पिकात सुधारणा होऊ शकते असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान अमळनेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे खतामुळे नुकसान झाले आहे त्यांना ग्राहक न्यायालयात जाण्यासाठी मोफत वकील दिला जाईल त्यांनी खताची पक्की पावती, जीपीएसचा शेतातील फोटो, सातबारा उतारा,आधार कार्ड व नुकसानीच्या पंचनाम्याची प्रत आदी कागदपत्रे आणून द्यावीत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले आहे.