
वनविभाग झाले बेजार, समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याचा दिला इशारा…
अमळनेर:- शहरातील रहिवासी भागात बिबट्या दिसत असल्याची अफवा काही उपद्रवी लोकांकडून पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभाग ही आपण बेजार झाला आहे. या संदर्भातल्या खोट्या अफवा पसरवल्यास वन कायद्याअंतर्गत संबंधित समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे.
तालुक्यातील मुडी बोदर्डे येथे गेल्या ७ ऑगस्ट रोजी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गाईच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आल्याने त्या घटनेत तथ्य असले तरी त्यानंतर काही दिवसांनी अमळनेर शहरातही बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या अफवा सोशल मीडियावर काही समाजकंटक पसरवत आहेत. इंटरनेट अथवा फोटोशॉपच्या माध्यमातून अशा खोट्या बिबट्याच्या पोस्ट तयार करून या भागात बिबट्या दिसला, त्या भागात दिसला, अशी खोटी अफवा पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने अशा घटनांचा तपास केला असता कुठेही बिबट्या अथवा बिबट्या सदृश्य प्राण्याची छबी दिसून आलेले नाही. तसेच काही समाजकंटक रात्री अपरात्री वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून संबंधित घटनास्थळी बोलवत आहे. मात्र संबंधित घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे निव्वळ वन विभागाची दिशाभूल करणे आणि नागरिकांमध्ये भीती पसरवण्याचा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतमजूर शेतात जाण्यासाठी कचरत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
एकाने मागितली माफी…
अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्या एका पोस्टची खात्री केली असता संबंधिताने ते खोट्या पद्धतीने तयार केले असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यास वन विभागाने तंबी त्याला गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्याने वन अधिकाऱ्यांची माफी मागितली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वनविभाग नेहमी सतर्क असून बिबट्या दिसताच त्यास निश्चितच पिंजऱ्यात बंद करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती वनपाल पी. जे. सोनवणे यांनी दिली आहे.
बिबट्या असल्याच्या समाजकंटकांकडून अफवा:- वनपाल सोनवणे…
कोणत्याही नागरिकांने बिबट्या दिसल्याची खोटी अफवा सोशल मीडिया अथवा कर्णोपकर्णी पसरू नये, असे आढळल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. वन विभाग नेहमीच सतर्क असून बिबट्या प्राण्यांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सध्या तरी अमळनेर शहरात व तालुक्यात बिबट्याचा कोणताही मुक्त संचार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
:- पी.जे. सोनवणे, वनपाल, अमळनेर







