
किसान काँग्रेसने महावितरणला आंदोलनाचा दिला इशारा…
अमळनेर:- तालुक्यात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असून महावितरणकडून शेतीच्या फिडरवर लोडशेडींग सुरू करण्यात आल्याने बळीराजाची कोंडी झाली आहे.

किसान काँग्रेसकडून अमळनेर येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून शेतीच्या फिडरवर सुरू करण्यात आलेली इमर्जेन्सी लोडशेडींग तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात गेल्या ३५ दिवसांपासून पाऊस पडलेला नसून शेतकऱ्यांची परिस्थीती गंभीर झालेली आहे. काही शेतकरी आपल्याकडील विहिरीतील पाण्याचा वापर करून पिके जगविण्याचा प्रयत्न करत असताना इमर्जेन्सी लोडशेडींगमुळे विद्युत पुरवठा अवेळी बंद होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे ठरल्यावेळेप्रमाणे विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा ५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर काढण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे किसान काँग्रेसने दिला आहे. निवेदन देतेवेळी सुरेश पिरण पाटील, प्रा. सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, सुनील पाटील, नीलकंठ पाटील, प्रवीण जैन आदी उपस्थित होते.




