
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील शेतकऱ्याच्या धुळे जिल्हा शिवारात असलेल्या शेतात असलेल्या वासरूवर बिबट्याने हल्ला करत ठार केले आहे.

मांडळ येथील शेतकरी लालचंद दंगल पाटील यांच्या मालकीच्या गावाला लागूनच मात्र धुळे जिल्ह्याच्या तामसवाडी शिवारात असलेल्या शेतात बिबट्याने १२ महिन्याच्या वासरूवर गुरुवारी रात्री हल्ला करून ठार केल्याचे शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. आठवडयातली ही दुसरी घटना असल्याचे शेतकरी लालचंद पाटील यांनी सांगितले असून पाच दिवसांपूर्वी याच शिवारात सुनील कोळी यांच्या शेतातील वासरुवर बिबट्याने हल्ला केल्याचे शेतकऱ्यांने सांगितले. त्याच्या आधी मांडळ शेजारील मूडी या गावातील बाळासाहेब संदानशिव यांच्या शेतातील वासरू देखील बिबट्याने अशाच पद्धतीने हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे मांडळ आणि तामसवाडी शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान अमळनेर वन विभागाचे वन रक्षक रामदास वेलसे आणि धुळे जिल्ह्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.




