
श्रावण महिन्याच्या निमित्ताने यावर्षी यात्रोत्सवाचे स्वरूप झाले प्राप्त…
अमळनेर:- धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर खान्देश गंगा सुर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावर दक्षिण तीरावर निर्जनस्थळी हजारो वर्षांची परंपरा असलेले पुरातनकालीन, जागृत व नवसाला पावणारे स्वयंभू त्रिपींडी “श्री क्षेत्र कपिलेश्वर” येथे श्रावण व अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास निमित्ताने दिवसरात्र त्रिपिंडी महादेवाचा हरहर महादेव म्हणत गजर होत आहे.

भल्या पहाटे तापी स्नान, तापी आरती, भस्म आरती, तापी महात्म्य, पुरुषोत्तम मास, महात्म्य आदींवर श्रीक्षेत्र कपिलेश्वर महती श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज कथन करतात. या सर्व कार्यक्रमात भक्तांची मांदियाळी पहायला मिळते. त्यात श्रावण प्रसाद म्हणून सत्यनारायण पूजा, महाप्रसाद आदी दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल असते. पुरुषोत्तम मास श्रावण मास अशी सलग दोन महिनेपासून अखंड रामधून चालू असून त्यात महिला व पुरुष समानतेने सहभागी होतात. पुढे येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील पित्तर काळात पितृदोष घालविण्यासाठी महाराष्ट्र सह गुजरात,मध्यप्रदेशातुनही भावीक वर्ग पितृशांती करण्यासाठी तापी पांझरा नदीच्या संगमस्थळी येऊन तर्पण विधी करतात तर पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणात देवदर्शना सोबत नौकानयनाचा दुहेरी आनंद घेऊन पूर्ण दिवस कुटुंबासह कपिलेश्वरस्थळी थांबून असतात.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे अखिल भारतीय संत संमेलन भरविल्यापासून विविध धार्मिक विधीला येथे मान्यता मिळाल्या पासून खान्देश सह परप्रांतातून ही भाविक श्रावण व पुरुषोत्तम मास निमित्ताने येऊन पितृशांती सह विविध तर्पण विधी व रात्री परिसरातील निरंकारी भजनी मंडळाकडून शिवरात्रीचा जागर महाशिवरात्री पर्वा निमित्त करतात. तसेच दुसर्या मांत्रिक- तांत्रिक रात्री तापी स्नान करतात व सवाद्य कपिलेश्वराचे दर्शन घेतात. श्रावण निमित्ताने यावर्षी यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून श्रावण साजरा करण्यासाठी मंदिर प्रशासन सोमवार पासून सज्ज झाले असून पार्किंग,भक्त निवास , पाणीपुरवठा, नदीपात्रात दुर्घटना टाळण्यासाठी स्वयंसेवक असतात. सध्या श्रावण मास निमित्त मंदिर परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे असे विश्वस्थ तुकाराम चौधरी यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर आख्यायिका…

विविध पुरातन धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे पुरातन काळापासून तप, यज्ञकर्म, तर्पण विधी ,पार्थिव शिवलिंग पूजन आदींची कपिलमुनींनी येथे सुरूवात करून काही काळ तपश्चर्या व योगसाधना केली त्या वेळी कपिला गाय येत असे त्यावरून शेकडा वर्षेपूर्वी ” श्री क्षेत्र कपिलेश्वर” मंदिरातील त्रिपींडी महादेवाच्या मुर्त्याची स्थापना केल्याचा इतिहास शिलालेखावरून आढळतो. संस्कृत व मोडी लिपीत दिपमाला व मंदिराच्या तटरक्षक भिंतीवर लिहीलेले शिलालेख आज ही आहेत. १७ व्या शतकात थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिललेखासह मंदिराच्या हेमांड पंथीय आकर्षक व विलोभनीय बांधकाम १६ व्या शतकात झाल्याचे शिलालेख येथे आज हि दिसतात. मंदिर पूर्ण काळ्या पाषाण दगडांनी हेमांडपंथी बांधले आहे तर १८ दगडी खांबावर मोठा सभामंडप व त्यावर तीन घुमट व एक मध्यभागी मुख्य घुमट असे पूर्वाभिमुख मंदिर आहे, तर दररोज सूर्यकिरण थेट त्रिपिंडीवर येऊन दर्शन घेतात हा विलक्षण क्षण काहीकाळच भक्तांना अनुभवता येतो, पायथ्याशी तापिनदीचे व पांझरा नदीचे विहंगम सगमस्थळ त्यात दोन्ही बाजूला पाणी व २५ नौकातुन नौकानयनचा आनंद घेत अमळनेर ,चोपडा ,पारोळा ,धरणगाव ,एरंडोल व धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा भागातुन भावीक दर्शनासाठी येतात तर माजी मंत्री जयकुमार रावल हे सुद्धा नौकेतून मंदिर स्थळी येऊन दर्शन घेतात मात्र येथे खोल डोह असल्याने खबरदारी घेतली जाते. मंदिर शेजारी अनिरुद्ध बापूचा आश्रम असल्याने भक्त परिवार मुंबई व बाहेर राज्यातून ही भाविक महाशिवरात्रीला कपिलेश्वर दर्शनासाठी येतात
पुरातन कालीन इतिहास असलेले कपिलेश्वर मंदिर हे नकाशावर त्यासाठी मात्र एक इंच जागा प्रत्यक्षात उताऱ्यावर नाही म्हणून संस्थांनचे सचिव मघन पाटील यांनी प्रयत्न केले असून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा व मंदिर परिसरात विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर व तापी महात्म्य प्रचार प्रसार करण्यासाठी मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना जनजागृती समितीचे पदाधिकारी मध्यप्रदेश येथील तापी नदीचे उगमस्थान असलेल्या मूलताई येथे अखंड रामधून सुरू असून तापी नदीची परिक्रमा महत्व विशद करण्यासाठी कपिलेश्वर मंदिर संस्थांनचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज व भक्तगण परिश्रम घेत असून सलग दोन महिन्यापासून गावागावात थांबून प्रवचन सुरु आहे.
अमळनेर येथील मत्स्यव्यवसाय मंडळ कडून येणाऱ्या भक्त परिवारास श्रावण महिन्यातील सोमवारी साबुदाणा खिचडी व उपवास फराळ वाटप करण्यात येत असते त्यासाठी स्वतंत्र मंडप व पाणी व्यवस्था मत्स्य व्यापारी संघा कडून करण्यात आले आहे , त्यासाठी मुखतार खाटीक व मित्र परिवार मेहनत घेत आहेत




