
मारवड संस्थेतील शिक्षक नितीनकुमार सनेर यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप…
अमळनेर:- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारींनी सेवाजेष्ठ असून सुद्धा मुख्याध्यापक म्हणून मान्यता नाकारल्याचा आरोप मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाचे शिक्षक नितीनकुमार प्रभाकर सनेर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या मारवड, करणखेडे आणि डांगरी येथे तीन शाळा असून करणखेडे व मारवड येथे मुख्याध्यापक पद रिक्त झाले होते. सनेर हे दिव्यांग असून संस्थेत सर्वात जेष्ठ आहेत. नियमाप्रमाणे त्यांना मारवड येथेच मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती द्यायला हवी होती असा त्यांनी दावा केला. संस्थेत दोन कार्यकारिणी असल्याने दुसऱ्या कार्यकारिणीने त्यांचा मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव पाठवला असता शिक्षणाधिकारींनी तीन दिवसात तीन निर्णय देऊन अखेरीस मान्यता नाकारली. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे मान्यता देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. अमळनेर येथील विश्राम गृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत अरविंद पाटील, दिनेश शिसोदे, अनिल पाटील, कैलास पाटील हजर होते. यावेळी अरविंद पाटील यांनी सांगितले की, संस्थेत समांतर कार्यकारणीचा वाद असताना बदली प्रस्ताव मंजूर होवू शकत नाही. मात्र आपली मनमानी सुरू ठेवण्यासाठी डांगरी येथील कार्यरत मुख्याध्यापकास मारवड येथे मुख्य शाखेत बदली करून मुख्याध्यापक बनविण्यात आले. मात्र मारवड येथे कार्यरत असलेल्या सनेर या ज्येष्ठ शिक्षकास डावलण्यात आले असून या शिक्षण विभागाची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
प्रतिक्रिया…
शिक्षक नितीन सनेर यांना संस्थेने संस्थेच्याच दुसऱ्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली होती त्यांनी ती नाकारली आहे. मारवड येथेच नियुक्तीचा आग्रह कश्यामुळे असून आपण न्यायालयाच्या अथवा शिक्षणाधिकारींच्या आदेशाला बांधील असू असे विरोधी गटाचे जयवंतराव मन्साराम पाटील यांनी सांगितले आहे.




